परिचय.
मराठी वाड्मयात पोवाडे आणि लावणी यांना स्वतंत्र स्थान आहे.महानुभाव,संत,पंडित,आणि शाहिरी साहित्य, ही मराठी रथाची चार चाके,यांनी केलेली वाड्मय निर्मिती यावरच मराठी वाड्मयाचा प्रवास चालू आहे.
संताच्या भक्तिभावातून गौळणी,अभंगाची निर्मिती झाली,याच भावनेतून पुढे लावणी अवतरली.लावणीची निर्मितीमागची प्रेरणा भक्तीची होती.या भक्तिभावात स्त्री मनाची विविध रुपे प्रकट झालेली आहेत.पुरुषमनाला असलेली स्त्रीदेहाची,आणि शृंगाराची अभिलाषा काही गौळनीतुन व्यक्त होताना दिसते.हीच अभिलाषा लावणीला कारणीभूत ठरली असावी.श्रीकृष्ण,विट्ठल,पांडुरंग यांच्याविषयीचा भक्तिभाव,अभंग,यालाच जोड मिळाली ती लोकजीवनातील लोकगीतांची.लोकगीतातील प्रेमभावना म्हणजे गौळणी,विराण्या,इत्यादी रचना दिसतात.संतांनी भागवतातील श्रीकृष्णाला नायक करून या परब्रह्माला राधेची आणि गौळणीची साथ देऊन भक्तीतून श्रुंगारभाव व्यक्त केला.राधा,गौळ्णी,आणि कान्हा,यांच्या श्रुंगारक्रिडा,आणि त्याला असलेला अध्यात्माची जोड त्यामुळे तो शृंगार अध्यात्माच्या आवरणाखाली झाकला गेला.पुढे यातील अध्यात्म गेले,आणि शृंगार राहिला.यातूनच लावणीचे रूप साकार झाले असावे,श्रीकृष्ण विषयी भक्तिभाव व्यक्त करतांना शाहीरांनी गोपी-कृष्ण,यांच्या स्त्री देहाचे वर्णन करताना अनेक शृंगारिक लावण्या लिहिल्या.लावणीची निर्मिती परंपरा प्राचीन गीतात विशेष दिसते. मराठी भाषा आणि मराठी प्रदेश यांची लावणी आणि पोवाडे ही भूषणे आहेत .लावणी वाड्मय समजून घेण्यापूर्वी लावणी ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे.
