
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत. सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर शंभू महादेवाच्या डोंगररांगेतील शिखरावर हे मंदिर प्रचीन काळा पासून प्रसिध्द आहे. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येवून राहिला होता. त्यानेच शिंगणापुर गांव वसविले. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत. मालोजीराजे आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी एक मोठे तळे येथे बांधले, त्यास पुष्करथिर्थ असे म्हणतात. पुर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचा जिर्णोध्दार झाला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्यतज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.


स्थान
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
बांधकाम
या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे.
आध्यात्मिक महत्व
मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
ऐतिहासिक महत्व
महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला.
प्रेक्षणीय स्थळे
मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात.
चित्रपट
शंभू माझा नवसाचा हा या अध्यात्मिक स्थानावर चित्रीत चित्रपट आहे. अलका कुबल-आठल्ये,मिलिंद गुणाजी या प्रमुख कलाकारांच्या यात भुमिका आहेत.
No comments:
Post a Comment