आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Friday, March 11, 2011

लावणी (लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे)


                                 

लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे.[१] 'लास्य' रसाचे दर्शन घडविणारी लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे. पॅरिसच्या ऑयफेल टॉवर समोर भारत महोत्सवात नृत्य समशेर माया जाधव यांनी लावणी सादर केली. त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. 'सुंदरा मनामध्ये भरली' हा लावणीवर आधारित कार्यक्रम अमेरिकास्थित मराठी कलावंत डॉ. मीना नेरुरकर यांनी सादर केला. त्यामुळे लावणीकडे अभिजनवर्ग वळला हे जरी खरे असले तरी गावोगावच्या जत्रांमधून, उत्सवांमधून लावणी पिढ्यान् पिढ्या जनसामान्यांचे रंजन करीत राहिली.
'लावणी'च्या उत्पत्ती विषयी दोन स्वतंत्र विचारप्रवाह आहेत. लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, गौळणी, बाळक्रीडेचे अभंग यात दिसते. संतांचे संस्कार घेऊन तंतांनी म्हणजे शाहिरांनी ज्या विविध रसांच्या रचना केल्या त्यात लावणीही होती. आपल्याकडील संतांचे संस्कार हे तंतांवर होते. बाराव्या, तेराव्या शतकात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जी आध्यात्मिक क्रांती झाली त्या क्रांतीपर्वात अनेक संत उदयाला आले ते भिन्न जातीपातीचे होते. पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू, कर्नाटकचे पुरंदरदास, संत मीराबाई, तुलसीदास, महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, तुकारात, एकनाथ, गोरोबा, सावता, चोखा, कान्होपात्रा, नरहरी अशी अनेक संत मंडळी विविध सामाजिक स्तरातील होती. संतांचा हा कार्यकाळ थेट १७ व्या शतकापर्यंतचा. त्यानंतर १९ व्या शतकापासून तंतांचा म्हणजेच शाहिरांचा उदय झाला. ज्यात प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ, हैबती, अनंत फंदी आदींचा समावेश होता. या शाहिरांनी अनेक गण, लावण्या रचल्या. त्या सर्वच लावण्या शृंगारिक होत्या, असे नव्हे तर भक्तीरसप्रधान, वीररसयुक्त, वात्सल्यरसप्रधानही होत्या. विसाव्या शतकात पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, अर्जुना वाघोलीकर, हरि वडगावकर, दगडू बाबा साळी आदी तमाशा कलावंतांनी गण, गौळणी, लावण्या, कथागीते रचली. या कथागीतांचीच पुढे वगनाट्ये झाली. 'भृंगावर्ती गेय रचना' म्हणजे लावणी. लवण म्हणजे मीठ. जशी मीठाशिवाय जेवणाला चव नाही तशीच लावणीशिवाय कुठल्याही मनोरंजन कार्यक्रमाला लज्जत नाही. 'लावणी' म्हणजे चौकाचौकांचे पदबंध लावत जाणे. गाणे कृषीप्रधान संस्कृतीत श्रमपरिहारासाठी जी गीते गायली जातात त्यांची जातकुळी लावणी सारखीच असते. लावणी शब्दाचे साधर्म्य कृषी संस्कृतीतील पेरणी, लावणीशी देखील जोडली जाते. संत साहित्यानंतरचा काळ हा लावणीचा उदयकाळ मानला जातो.


                                                

लावणीचे प्रकार

लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. नृत्यप्रधान लावणी, गानप्रधान लावणी आणि अदाकारीप्रधान लावणी. प्रारंभकाळात लावणी गेय स्वरुपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रुप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रुपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. पंढरपुरीबाजाची लावणी ही संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'छकुड' म्हणजे द्रूतलयातील, उडत्या चालीची लावणी, यमुनाबाई वाईकर यांनादेखील लावणीतील विशेष योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी बालेघाटी लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

                            
अदाकारी

मधुचंद्राचा अनुभव घेणार्‍या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिका वधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवित. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रु येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवित. पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारुन डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे सांगितले. यमुनाबाई वार्द्यकरांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक नर्तक बिर्जू महाराज यांच्या सोबत लावणीची अदाकारी केली होती. 'तुम्ही माझे सावकार' ही विलंबित लयीतील लावणी यमुनाबाई अदाकारीसह सादर करीत असत. 'पंचकल्याणी घोडा अबलख' ही नृत्यप्रधान लावणी अथवा 'पंचबाई मुसाफीर अलबेला' ही नृत्यप्रधान लावणी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर यांनी खूपच लोकप्रिय केली होती. घुंगरांच्या बोलांचा आवाज, घोड्याच्या टापांसारखा काढण्याचे कसब या लावणी सम्राज्ञींनी आत्मसात केले होते. नृत्य, अदाकारी आणि गायन असा त्रिवेणी संगम घडविणार्‍या लावण्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर, सुरेखा पुणेकर सादर करीत असत. 'पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन' ही अदाकारीची लावणी गुलाबबाई संगमनेरकर यांनी लोकप्रिय केली आहे. अकलुजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवातून तसेच शासनाच्या लावणी महोत्सवातून अलिकडच्या काळात ज्या लावणी नर्तिका प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यात राजश्री नगरकर, आरती नगरकर, छाया खुटेगावकर, माया खुटेगावकर, वैशाली परभणीकर, रेश्मा-वर्षा परितेकर आदींचा उल्लेख करवा लागेल. लावणीची मोहिनी आजही मराठी मनावर कायम आहे. ही लावणी अशी -
आशुक माशुक नार नाशिकची गोदे तटी रामाच्या घाटी चांदीची लोटी बसले घाशीत हशी खुशीने पदर सावरी ग भिजे लुगडे वरती आवरी ग हळदी कुंकवाचा डाव्या हाती डबा डबा उडे चालताना बाईचा झुबा झुबा पुढे रस्त्यात मैतर उभा उभा.


No comments:

Post a Comment