आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Friday, March 11, 2011

लावणीचा परिचय.



                                
 परिचय.
मराठी वाड्मयात पोवाडे आणि लावणी यांना स्वतंत्र स्थान आहे.महानुभाव,संत,पंडित,आणि शाहिरी साहित्य, ही मराठी रथाची चार चाके,यांनी केलेली वाड्मय निर्मिती यावरच मराठी वाड्मयाचा प्रवास चालू आहे.
संताच्या भक्तिभावातून गौळणी,अभंगाची निर्मिती झाली,याच भावनेतून पुढे लावणी अवतरली.लावणीची निर्मितीमागची प्रेरणा भक्तीची होती.या भक्तिभावात स्त्री मनाची विविध रुपे प्रकट झालेली आहेत.पुरुषमनाला असलेली स्त्रीदेहाची,आणि शृंगाराची अभिलाषा काही गौळनीतुन व्यक्त होताना दिसते.हीच अभिलाषा लावणीला कारणीभूत ठरली असावी.श्रीकृष्ण,विट्ठल,पांडुरंग यांच्याविषयीचा भक्तिभाव,अभंग,यालाच जोड मिळाली ती लोकजीवनातील लोकगीतांची.लोकगीतातील प्रेमभावना म्हणजे गौळणी,विराण्या,इत्यादी रचना दिसतात.संतांनी भागवतातील श्रीकृष्णाला नायक करून या परब्रह्माला राधेची आणि गौळणीची साथ देऊन भक्तीतून श्रुंगारभाव व्यक्त केला.राधा,गौळ्णी,आणि कान्हा,यांच्या श्रुंगारक्रिडा,आणि त्याला असलेला अध्यात्माची जोड त्यामुळे तो शृंगार अध्यात्माच्या आवरणाखाली झाकला गेला.पुढे यातील अध्यात्म गेले,आणि शृंगार राहिला.यातूनच लावणीचे रूप साकार झाले असावे,श्रीकृष्ण विषयी भक्तिभाव व्यक्त करतांना शाहीरांनी गोपी-कृष्ण,यांच्या स्त्री देहाचे वर्णन करताना अनेक शृंगारिक लावण्या लिहिल्या.लावणीची निर्मिती परंपरा प्राचीन गीतात विशेष दिसते. मराठी भाषा आणि मराठी प्रदेश यांची लावणी आणि पोवाडे ही भूषणे आहेत .लावणी वाड्मय समजून घेण्यापूर्वी लावणी ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे.
"१)'लावणी' हा शब्द संस्कृत "लू" या धातूवरून आला "लू" म्हणजे कापणी शेतातील पीक कापणीच्या वेळी म्हणायचे गीत ती "लावणी".
२)'लवन' म्हणजे 'सुंदर' यावरून लावण्य-लावणी शब्द तयार झाला.
३)'लावणी 'नृत्यात नर्तकी शरीर सहजपणे लववते म्हणून 'लवणी' त्यावरून लावणी.
४)'लापनिका' या संस्कृत शब्दापासून 'लावणी' हा शब्द तयार झाला असावा लापनिका हा शब्द महानुभाव साहित्यात केशवराव सुरी यांनी वापरला आहे.त्यांच्या ग्रंथाचे नाव 'लापनिका' असे आहे.
५)'लावणी' हा शब्द ज्ञानेश्वरांनी सोळाव्या अध्यायात वापरला आहे.-
तेया निरोपनाचेनि नावे ! अध्यायपद सोळावे !
लावणी पाहता जाणावे ! मागितला वरी !!
ज्ञानेश्वरांनी लावणी हा शब्द मांडणी रचना या अर्थाने उपयोजिला आहे.लावण्य हा शब्दही ज्ञानेश्वरीत आला आहे.
देशियेचे लावण्य ! हिरोनि आणिले तारुण्य !
मग रचिले अगन्य ! गीतात्त्व !! 
शेतात शेतकरी पेरणी करतो,लावणी करतो. ही पेरणी किंवा लावणी करताना अगोदर नीट आखणी मांडणी करावी लागते.ठराविक अंतरावर रोपे लावली जातात शेतक-याची लावणी मोठी देखणी असते. त्या लावणीत पेरणीतही एक प्रकारची भूमीतीय सौंदर्य असते शाहिरांनी अशीच देखणी रचना करून मांडणी करून लावणी अविष्कारली.ज्ञानेश्वरांनी देशियेच्या लावण्या साठी तारुण्य हिरोनि आणले आणि गीतातत्व "रचिले", ही सुद्धा एक रचनाच आहे. अशी लावण्ययुक्त रचना करून शाहिर लावणी लिहितो.
६) -हदयाला चटका लावते ती लावणी - अ.ब. कोल्हटकर.
७) म.वा.धोंड, लावणीच्या बाबतीत म्हणतात की,"सर्व सामान्यजनांच्या मनोरंजनाकरिता त्यांना रुचतील अशा लौकिक,पौराणिक,वा आध्यात्मिक विषयावर रचलेली,ढोलकीच्या तालावर विशिष्ट ढंगाने म्हटलेली,खटकेबाज,व सफाईदार पद्मावर्तनी वा भृंगावर्तनी जातिरचना म्हणजे लावणी"
                    
                          
लावणीचे प्रकार.
१)फडाची लावणी:- नाच्या,सोंगाड्या इत्यादी कलाकारांच्या साथीने नृत्य आणि अभिनयाच्या जोडीने ढोलकीवर गायली जाणारी लावणी.
२)बैठकीची लावणी :- तबला,पेटी,तंबुरी यांच्या साथीने लावणी गायिका लावणी बैठकीत सादर करतात.
३)बालघाटी;- विरह-दु:खाची भावना आळवणारी.
४)छक्कडः- उत्तान- शृंगारिक आशय असणारी.
५) सवाल -जबाबयुक्तः- कलगीतुरेवाली प्रश्नोत्तरे असलेली.
६) चौकाची लावणी ;- चार चौकाची.चार वेळा चाली बदलणारी.
७) प्रतिकात्मक लावणी :- स्त्री-पुरुषांच्या भावना प्रतीकातून मांडणारी उदा.'तुझ्या ऊसाला लागल,कोल्हा' या सारख्या सुलोचना चव्हाण यांनी गायिलेल्या लावण्या.
लावणी एका अर्थाने स्तुती गीतेच आहेत.लावणीत केलेली स्त्रीदेहाची आणि सौंदर्याची वर्णनेही स्तुतीच आहे.शाहिरांच्या कवनातील स्त्रिया तत्कालीन उच्चभ्रू समाजाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. त्या यौवना आहेत.रूपवती,देखण्या आणि टंच भरलेल्या सौंदर्याच्या पुतळ्या आहेत.शृंगाराला पोषक त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. याचा अर्थ लावणीत फक्त शृंगारच आहे असे नाही.त्यातही विविधता आहे."
गणेश,शंकर,आणि इतरही देवतांची स्त्रोत्रे,तुळजापूर,पंढरपूर,पैठणसारख्या क्षेत्राची वर्णने: वेदांत,अध्यात्म,पंचीकरण सावित्री,हरिश्चंद्र,यासारख्या पुराणकथा,लक्ष्मी पार्वती किंवा श्रीकृष्ण- राधा संवाद, दुष्काळाचे वर्णन,सुर्योदयाचे वर्णन,सती जाण्याचे वचन देणारा कामुक नवरा, इत्या्दी कथांतील शृंगारिक भावाबरोबर,भक्ती,शांत,वीर,करुण,वत्सल,हास्य,बीभत्स,असे विविध रस ही लावणीत दिसतात.
मुलूखगिरीत गुंतलेल्या,संसारात शिणलेल्या व विलासात आंबलेल्या मनाला परत ताजेतवाने करून जीवनात नवा रंग भरण्याकरिता शाहिरांनी लावण्या रचल्या असाव्यात.
                       
                                
लावणीचा उद्धार.
लावणी सामान्य रसिकांमुळेच भरभराटीला आली.उत्तर पेशवाईत लावणी-पोवाड्याला बहर आला.महत्त्वाचे शाहीर याच काळात झाले.याच काळात वीररसापेक्षा शृंगारिक लावण्याच अधिक लिहिल्या गेल्या, याचा अर्थ पेशवा आणि त्यांचे सरदार शिपाई यांच्या अंगात लावणीमुळे तेज आले,शौर्य आले असे म्हणणे हास्यास्पद ठरेल.उलट यामुळे पेशवे चैनी,विलासी,ऐषारामी,व्यसनी आणि स्त्रीलंपट तसेच नादानही झाल्याचे अनेक चर्चेतून वाचावयास मिळते.उत्तर पेशवाईत शृंगाररसास कवटाळून बसल्यामुळे,वीररस,निर्माण झाला नाही अथवा शिवछत्रपतींच्या काळात वीररसामुळे श्रुंगाररसयुक्त लावण्याची सुरुवात झाली नाही.
गेयता,नाट्यात्मकता आणि म-हाठीपना हे पोवाडे आणि लावणीचे खास वैशिष्ट्ये,त्यातला श्रुंगारभाव जसा मनाला भिडतो,तसाच त्याच्यातली नाट्यात्मकता अधिक परिणामकारक ठरते.( वि.का. राजवाडे,यांच्या 'महिकावतीच्या बखरीत' पोवाड्याच्या बाबतीत, शाहिराबद्दल, त्यांनी विवेचन केले आहे.पण ते येथे लिहिण्याचे टाळतो आहे.)




No comments:

Post a Comment